भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात दारूच्या नशेत घरात घुसून तरुणीचा विनयभंग, मारहाण आणि सोनसाखळी हिसकावून नेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत मध्यस्थी करण्यासाठी गेलेली सासू आणि एक नातेवाईकही जखमी झाले आहेत. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र उर्फ डेव्हिड अशोक सरवटकर याने कथितरीत्या दारूच्या नशेत पीडितेच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. यावेळी त्याने तरुणीशी अश्लील वर्तन करत तिच्यावर सुरीने वार करून दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेदरम्यान पीडितेला वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी तिची सासू मध्ये पडली. मात्र, तिलाही धक्का देऊन खाली पाडल्याचे सांगण्यात येते. याशिवाय एका नातेवाईकाच्या डाव्या गालावर सुरीने वार करून त्याला जखमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे फेकरी गावात खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश शंकर सरदार पुढील तपास करत आहेत. आरोपीविरुद्धच्या आरोपांची पडताळणी आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.



