जळगाव प्रतिनिधी | पाळधी गावाजवळील पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा भराव खचल्याने भीषण दुर्घटना घडली. रस्त्याचा काही भाग खचून त्यासोबत क्रेन मशीन थेट पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत मधुकर धनराज पाटील यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या भरावाचा काही भाग अचानक खचला. यामुळे क्रेन मशीनसह रस्त्याचा भाग खाली कोसळला. या दुर्घटनेत सिमेंटच्या सुरक्षा प्लेट्सही खाली पडल्या. या घटनेमुळे पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी आसोदा गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या एका बाजूचा भराव कोसळण्याची घटना घडली होती. त्या ठिकाणी अद्याप दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यातच पाळधीजवळ पुन्हा अशाच प्रकारची दुर्घटना घडल्याने संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पावर अशा घटना घडत असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उद्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत दुर्घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या पाहणीत दुर्घटनेची कारणे आणि बांधकामाच्या दर्जाबाबत काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



