जळगाव प्रतिनिधी | धरणगाव शहरातील हेडगेवार नगर परिसरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. शाकीब दाऊद शेख, अश्पाक शेख मुस्ताक शेख आणि इम्रान शेख फिरोज शेख अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील हेडगेवार नगर परिसरात तक्रारदार आकाश बाळू तायडे यांच्या राहत्या घरात चोरी झाली. २६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
या घटनेनंतर धरणगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणात २७ ऑक्टोबर रोजी रात्री तिघांना अटक करण्यात आली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे कानातील दागिने, सोन्याचे गोलाकार पेंडंट, चांदीचे पायातील पैंजण तसेच लहान मुलांचे चांदीचे दागिने आणि बाजूबंद यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३३ हजार ५०० रुपये नमूद करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या शाकीब दाऊद शेख याचे वास्तव्य एरंडोल येथील विठ्ठल मंदिराजवळील चांभार गल्ली परिसरात असल्याची नोंद आहे. अश्पाक शेख मुस्ताक शेख हा धुळे येथील चाळीसगाव रोड परिसरातील रहिवासी असून, इम्रान शेख फिरोज शेख याचे वास्तव्य एरंडोल येथील इस्लामपुरा परिसरात असल्याचे अहवालात नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण करीत आहेत.



