जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी मंगळवारी एरंडोल व धरणगाव तालुक्यांतील विविध गावांना प्रत्यक्ष भेट देऊन घरकुल बांधकामे, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची पाहणी केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळतो आहे का, तसेच त्यांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा दर्जेदार आहेत का, याची त्यांनी यावेळी प्रत्यक्ष पडताळणी केली.
हनुमंतखेडे येथे घरकुल बांधकामांची पाहणी
दौऱ्याच्या सकाळच्या सत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे येथे भेट देऊन सुरू असलेल्या घरकुल बांधकामांची पाहणी केली. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत घरे पूर्ण करता यावीत, यासाठी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट देऊन तेथील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सोयी-सुविधा आणि विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
गालापूर ग्रामपंचायत कार्यालयाला भेट
यानंतर त्यांनी एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थांना पुरविण्यात येणाऱ्या विविध नागरी सुविधा आणि स्थानिक पातळीवरील प्रशासकीय कामकाजाची त्यांनी पाहणी केली.
सोनवद प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची तपासणी
धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी भेट दिली. यावेळी आरोग्य केंद्र परिसरातील स्वच्छता, औषधसाठा तसेच रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांची तपासणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी आरोग्य केंद्रातील सर्व सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. नागरिकांना सेवा पुरविताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यावर भर
या क्षेत्रीय दौऱ्याच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी ग्रामीण भागातील विकासकामे आणि मूलभूत सुविधांच्या प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करणे, शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावणे आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.



