जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. आडगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंतर्दे पेट्रोलपंपाजवळ विनापरवाना वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडण्यात आला. या कारवाईत वाळूसह ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण २ लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आडगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंतर्दे पेट्रोलपंपाजवळ लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ७४४ एफई ट्रॅक्टर व त्याला जोडलेली ट्रॉली आढळून आली. या वाहनातून शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गौण खनिज वाळूची वाहतूक केली जात असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी सागर विलास सपकाळे (वय २३, रा. तानाजी मालुसरे नगर, जळगाव) याच्याविरुद्ध चोरी तसेच गौण खनिज व जमीन महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे २४ हजार २३० रुपये किमतीची एक ब्रास वाळू आणि दोन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉलीचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब नामदेव माळी यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अवैध वाळू वाहतुकीविरोधात पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.



