जळगाव प्रतिनिधी | दिवाळीचा सण आणि लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त साधत जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफा दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची लगबग सुरू असून, संपूर्ण बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.
दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व असते. विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे यंदा ग्राहकांकडून सोन्या-चांदीच्या लक्ष्मीमूर्ती, गणेशमूर्ती, नाणी आणि कॉइन्स खरेदीला अधिक पसंती दिली जात आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात स्थिरता असल्याचे चित्र आहे. त्यातच सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परिणामी, दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह वाढल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
सध्या जळगावच्या बाजारपेठेत सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ४२ हजार रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८८ हजार रुपये आहे.
एकीकडे दिवाळीचा उत्साह, तर दुसरीकडे दरातील घसरणीचा दिलासा यामुळे जळगावच्या सराफा बाजारात खरेदीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.



