
कार्यालयात बोलावून जबरदस्ती केल्याचा आरोप; फॉरेन्सिक तपासणीसह पोलिसांचा तपास गतीने
भुसावळ प्रतिनिधी : शहरातील एका २२ वर्षीय तरुणीवर ओळखीच्या व्यक्तीने कार्यालयात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी राजू गायकवाड याला तातडीने अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही टपाल विभागात कार्यरत असून ती भुसावळ येथे भाड्याच्या घरात राहत आहे. कामाच्या निमित्ताने तिची आरोपीशी पूर्वीपासून ओळख होती. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी आरोपीने तिला बसस्थानक परिसरात बोलावून घेतले व चर्चा करण्याच्या बहाण्याने मुक्ताई कॉलनीतील स्वतःच्या कार्यालयात नेले. तेथे दरवाजा बंद करून आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.


