
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना येत्या २ मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
जळगाव । उन्हाळी सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना येत्या २ मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार असल्याचे शिक्षण विभागाच्या परिपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा नेहमीपेक्षा लवकर घेण्यात आल्याने निकाल प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि इतर वर्गांचे शैक्षणिक नियोजन सुरळीत पार पडावे, यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात नव्या शैक्षणिक सत्राची तयारी मार्च महिन्यापासूनच सुरू करण्यात आली असून शाळा स्तरावर विविध प्रशासकीय व शैक्षणिक नियोजनाला वेग देण्यात आला आहे. नवीन प्रवेश प्रक्रिया, पाठ्यपुस्तकांची उपलब्धता आणि शाळांची देखभाल यांसारख्या कामांवर भर दिला जात असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.


