
नगराध्यक्ष सुनील काळेंची मंत्री सावकारेंवर नाराजी!
नगरपालिका निवडणुकीपासून वरणगावचे नगराध्यक्ष अपक्ष उमेदवार सुनील काळे हे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे विरोधात षड्डू ठोकून उभे होते. सुनील काळे यांनी भाजपची उमेदवारी नाकारण्यात संजय सावकारे यांचा हात होता. त्यांनी सुनील काळे यांना भाजपची उमेदवारी मिळू दिली नाही, असा आरोप काळे यांनी वारंवार केला. तरीपण सुनील काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून अपक्ष म्हणून दणदणीत विजय मिळवला. निवडून आल्यानंतर काळे यांनी “मी भाजपचाच उमेदवार आहे, माझी उमेदवारी गिरीश महाजन यांना अर्पण करत आहे,”
असे जाहीरपणे सांगितले. नगराध्यक्ष म्हणून सुनील काळे निवडून आल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी फोन करून ‘आमच्या पक्षात या तुम्हाला सर्व काही सहकार्य करू,’ असे सांगितले होते. परंतु सुनील काळे यांनी त्यांना नकार दिला आणि ते म्हणाले “मी भाजपचाच कार्यकर्ता आहे..” तेव्हा सुनील काळे हे जरी अपक्ष असले तरी ते भाजपचेच आहेत, असे गृहीत धरून मनात ते काही मतभेद असतील ते विसरून मंत्री संजय सावकारे यांनी त्याला समजून घ्यायला हवे होते आणि आपसात जमवून घेणे अपेक्षित होते. परंतु मंत्री सावकारे यांची ‘मेरी मुर्गीकी एकही टांग’ याप्रमाणे सुनील काळे यांना सहकार्य करण्याचे धोरण ठेवलेच नाही. सुनील काळे हे कार्यकर्त्यांमधला नेता आहे. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांचे विरोधात थोडीशी भूमिका घेतली आणि रक्षा खडसे यांच्याबरोबर एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते दिसतात.
भाजप कार्यकर्त्यांना त्या विचारात नाहीत, म्हणून जाहीर नकार कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला होता. त्याचा परिणाम मंत्री संजय सावकारे यांनी सुद्धा त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन सुनील काळे यांचे विरुद्ध भूमिका घेतली होती. काळे यांना भाजपची उमेदवारी देण्यास संजय सावकारे यांनी विरोध केला. त्यांना उमेदवारी मिळू दिली नाही. भाजपची उमेदवारी दुसऱ्याला दिली गेली. त्यात सुनील काळे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत विजय मिळवला. हे सर्व झाले असले तरी संजय सावकारे यांनी झाले गेले विसरून जायला हवे होते. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन सुनील काळे यांच्याबरोबर समझोता करायला हवा होता. तसे न करता संजय सावकारे यांनी मनात अढी धरून सुनील काळे यांच्या प्रत्येक कामाला विरोध करण्याचा सपाटा लावला. धरणगाव नगरपालिकेत लिलाबाई चौधरी या निवडून आल्यानंतर त्यांच्याशी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समझोता केला. आपण विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन काम करूया, असा तो समझोता होता.
त्यामुळे नगरपालिकेत बहुमत शिवसेनेचे असले तरी हेकेखोरपणाची भूमिका गुलाबराव पाटलांनी घेतली नाही. अन्यथा प्रत्येक कामामध्ये अडथळा निर्माण होऊन काम कुठेही होऊ शकले नसते. तशाच प्रकारे विकासाच्या बाबतीत संजय सावकारे यांनी वरणगाव आणि भुसावळ नगरपालिकेत धोरण ठेवायला हरकत नव्हती. पण भुसावळ मध्ये आतापर्यंत एकही महासभा होऊ दिली नाही. हे बहुमताच्या जोरावर होणार असेल तर एकही विकास काम होऊ शकणार नाही, हीच परिस्थिती वरणगाव नगरपालिकेत सुद्धा आहे..!
सुनील काळे यांचे एकही काम बहुमताचे जोरावर होऊ द्यायचे नाही, असे होत असेल तर ते योग्य नाही. भुसावळ नगरपालिकेच्या वतीने रेशनिंगचा कॅम्प घेण्यात आला. तेथे एकही अधिकारी फिरकला नाही. हे मंत्री संजय सावकारे यांच्या सांगण्यावरूनच झाले, असे म्हणणे आहे. त्याचबरोबर महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम सुनील काळे यांनी आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाला तहसीलदार व इतर अधिकारी कोणी फिरकले नाही. भाजपच्या नगरसेवकांनी रस्त्यावर महिला दिनाच्या कार्यक्रम केला. असे का व्हावे? याबाबत पत्रकारांनी मंत्री संजय सावकारे यांना विचारले असता ते म्हणाले की माझा या गोष्टीची अर्धाअर्थी संबंध नाही. अधिकाऱ्यांना सांगण्याचा मला अधिकार काय? कोणी कुठे कार्यक्रम करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझी बायको महिला दिनानिमित्त कुठे कार्यक्रम घेतील याची मला सुद्धा माहिती नाही.
त्यामुळे उगाच प्रत्येक गोष्टीबाबत माझ्यावर आरोप करणे हे चुकीचे आहे. माजी सभापती राजेंद्र चौधरी यांनी म्हटले की, सावकारे यांनी माझा केसाने गळा कापला. या संदर्भात बोलताना संजय सावकारे म्हणाले की, केसाने गळा कापण्याचा प्रश्नच येत नाही. भुसावळ नगरपालिकेत विरोधात कोणी काम केले? याची कल्पना आहेच. राजेंद्र चौधरी यांनी ते मान्यही केले आहे. त्यामुळे केसाने गळा कोण कापतो हे दिसून येते आहे. एकंदरीत चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्याला मी भिक घालत नाही, असे संजय सावकारे यांचे म्हणणे आहे. त्यावरून विकास कामासाठी कसलीही तडजोड करायची नाही, हे संजय सावकारे यांचे धोरण आहे..!


