जळगाव प्रतिनिधी । जळगावच्या कडक उन्हाची झळ सोसत असलेल्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक आणि माणुसकीचा ओलावा जपणारी बातमी समोर आली आहे. जळगाव नवीन बसस्थानकावर गेल्या दहा वर्षांपासून ‘जलसेवेचा’ एक अनोखा उपक्रम अत्यंत निष्ठेने राबविला जात आहे. उन्हाळ्याच्या कडक तडाख्यात प्रवाशांची तहान भागवण्यासाठी जळगाव जिल्हा माहेश्वरी समाज, प्रेम फाउंडेशन आणि कलंत्री परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हे मोलाचे काम अविरत सुरू आहे.
दरवर्षी कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच, म्हणजे २५ मार्च ते १ जून या कालावधीत बस स्थानकात येणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी हे थंड पाणी उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमाबद्दल माहिती देताना योगेश कलंत्री यांनी सांगितले की, दररोज साधारणपणे १५० ते ३०० लिटर पाणी प्रवाशांसाठी विनामूल्य पुरवले जाते. वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी हा छोटासा प्रयत्न मोठा दिलासा ठरत आहे.
जळगावच्या तप्त उन्हात प्रवाशांची होणारी ओढाताण पाहून, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा कलंत्री परिवाराचा हा ‘वसा’ गेल्या एक दशकापासून सातत्याने जपला जात आहे. केवळ एखाद-दोन वर्षे नाही, तर सलग १० वर्षे हा उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
प्रवाशांसाठी आधार बनलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. आजच्या धावपळीच्या आणि आत्ममग्न जगामध्ये अशा प्रकारचे समाजकार्य माणुसकीचा ओलावा जिवंत ठेवणारे आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन शहरातील इतर सामाजिक संस्थांनीही अशा प्रकारच्या समाजकार्यात पुढाकार घेणे काळाची गरज आहे. जळगाव बसस्थानकावर प्रवाशांच्या तृप्तीचे हसू उमलण्यासाठी कलंत्री परिवार आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी घेतलेली ही मेहनत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.



