पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा येथे एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवकाबाई किसन राठोड (वय ५५, रा. कोकडी तांडा) या लग्नाला जाण्यासाठी तयारी करत होत्या. त्यांनी दागिने काढण्यासाठी घरातील पेटीचे कुलूप उघडून पाहिले असता, त्यांना पेटीतील साहित्य अस्ताव्यस्त दिसले. पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीची बारकाईने पाहणी केली असता, ती एका बाजूने उचकटलेली दिसून आली.
चोरट्यांनी या घरफोडीत १५ हजार रुपये किमतीचे ५० भर चांदीचे कडे (वेले), ५ हजार रुपये किमतीची ३ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि १ लाख रुपये रोख (ज्यात ५०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता) असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. फिर्यादींनी नातेवाईकांकडे विचारपूस केली, मात्र काहीही माहिती न मिळाल्याने अखेर पोलिसांत धाव घेतली. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



