जळगाव प्रतिनिधी । आगामी सण-उत्सव, राजकीय घडामोडी आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा आता अधिक सतर्क झाली आहे. जिल्ह्याची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ‘गोपनीय अंमलदारांची’ एक महत्त्वपूर्ण आणि विस्तृत बैठक नुकतीच पार पाडली.
या बैठकीत प्रामुख्याने संवेदनशील गावे, जातीय तणाव आणि आगामी काळात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती, महाराणा प्रताप जयंती आणि ईद यांसारख्या सणांच्या मिरवणुकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे, इराणी गँग्सच्या हालचाली, गो-तस्करी, गांजा लागवड आणि अवैध पुतळ्यांचे वाद यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांचा आढावा घेऊन भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला.
गोपनीय अंमलदार हाच पोलीस दलाचा कणा :
बैठकीला संबोधित करताना पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, प्रत्येक पोलीस ठाण्याचे कामकाज चालवण्यासाठी गोपनीय अंमलदार हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आता दरमहा ‘एसपी टू डायरेक्ट गोपनीय अंमलदार’ अशी थेट बैठक घेतली जाणार आहे.
इंटेलिजन्सच्या आधुनिक तंत्रावर भर :
यावेळी अंमलदारांना ‘सेन्सिटाइज’ करण्यात आले असून, माहिती मिळवण्याचे विविध प्रकार विषद करण्यात आले. यामध्ये केवळ खबरदारी (Human Intelligence) न ठेवता, सोशल मीडिया (CYBINT), बातम्या आणि खुल्या स्त्रोतांद्वारे मिळणारी माहिती (OSINT), तांत्रिक माहिती (Technical/Electronic) आणि फॉरेन्सिक इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीट पोलिसिंग आणि गुन्हेगारांच्या डेटाबेसवर आधारित (CRIMINT) माहिती गोळा करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. या नव्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला चाप बसेल आणि सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



