जळगाव प्रतिनिधी | शहरातील गजबजलेल्या सिंधी कॉलनी परिसरात काल सायंकाळी एका दुचाकीला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुचाकी जळून पूर्णपणे खाक झाली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र नगर येथील रहिवासी आणि भाजी विक्रेता अंकित छोटू मौर्य हे आपल्या ‘हिरो मॅस्ट्रो’ (क्रमांक MH 19 CK 0030) या दुचाकीने काही कामानिमित्त सिंधी कॉलनी परिसरात गेले होते. सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास, ते रस्त्यावरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीच्या इंजिनमधून धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अंकित यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि खाली उतरले.
अंकित गाडीवरून उतरताच क्षणात आगीने संपूर्ण दुचाकीला वेढले. रात्रीची वेळ असल्याने आणि परिसर वर्दळीचा असल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की कोणालाही जवळ जाऊन आग विझवणे शक्य नव्हते. बघता बघता दुचाकीचा सांगाडा उरला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान तातडीने बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून नुकसान झाले होते.
सुदैवाने, चालक अंकित मौर्य वेळीच गाडीवरून उतरल्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भररस्त्यात घडलेल्या या अग्नितांडवामुळे सिंधी कॉलनीतील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.



