जळगाव प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सावखेडा शिवार, कोल्हे हिल्स परिसर, वाघ नगर, माऊली नगर आणि परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागात तब्बल पंधरा दिवसांनी केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली काव्यरत्नावली चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा विविध घोषणांनी दणाणून गेला.
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी रिकामे हंडे हातात घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठ्याबाबत यापूर्वीही अनेकदा निवेदने देण्यात आली, तसेच विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. महिलांना घरगुती कामांसह पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, याचा दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत परिसरात नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. समस्या तातडीने न सुटल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. या हंडा मोर्चामुळे शहरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



