जळगाव प्रतिनिधी | जळगाव महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने साजरा केला. “वाढदिवस साजरा करताना करूया विचार, पडत्या पावसात देऊया गरजूंना आधार” या संकल्पनेतून त्यांनी केक, बुके आणि बॅनरवर होणारा खर्च टाळून गरजू कर्मचाऱ्यांना रेनकोट भेट देण्याचा उपक्रम राबविला.
पिंप्राळा स्टॉप येथे आयोजित कार्यक्रमात सफाई कर्मचारी, आशा वर्कर, वायरमन, पोस्टमन यांच्यासह विविध क्षेत्रातील गरजू कर्मचाऱ्यांना एकूण 95 रेनकोटचे वाटप करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात आपले कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
यावेळी पिंप्राळा परिसरातील शिंदेनगर भागात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला अमर जैन, अतुल बारी, सागर पाटील, रवींद्र कोळी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, निलेश पाटील, नरसिंग पाटील, मयूर जाकिटे, मयूर चौधरी, रवींद्र थुदगर, शिवाजी सूर्यवंशी, नितीन राजपूत, राकेश राजपूत, स्वप्निल विधाते, लोटन पाटील, प्रदीपसिंग पाटील, शांताराम बारी, जितेंद्र पाटील, प्रणव पाटील, घनश्याम सोनवणे, दशरथ पुजारी, प्रदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



