चोपडा प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील धानोरा येथे रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सूर्यवंशी गुजर समाज सतपंथ मंदिर येथे झालेल्या या शिबिरात धानोरा, पंचक, मोहरद, पारगाव, चिंचोली, देवगाव, खोरगाव आणि अडावद परिसरातील तब्बल 453 महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
शिबिरात महिलांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी विशेष हिमोग्लोबिन तपासणी, औषध वितरण तसेच आरोग्य समुपदेशन करण्यात आले. याशिवाय सर्व नागरिकांसाठी मोफत दंत तपासणी, नेत्र तपासणी आणि गरजू रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासह दर्जेदार आरोग्य सेवा मिळाल्या.
उद्घाटन प्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, मानद सचिव स्वाती ढाके यांच्यासह विविध तज्ज्ञ डॉक्टर, रोटरी सदस्य आणि गांधी रिसर्च फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सतपंथ मंदिर सेवा समिती, गांधी रिसर्च फाउंडेशन आणि रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिरानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत अशा प्रकारचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर नियमितपणे आयोजित करण्याची मागणी केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणारा हा उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



