जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मोबाईल हिसकावून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. ही घटना मंगळवारी, ९ सप्टेंबर रोजी घडली.
वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दीपक बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे हे आकाशवाणी चौकातील ट्रॅफिक पॉईंटवर ड्युटीवर होते. यावेळी दत्त मंदिराच्या बाजूने एक व्यक्ती पायी जात असताना दोघा संशयितांनी त्याला अडवून त्याचा मोबाईल हिसकावला. त्यानंतर दोघांनी मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत दोघांना अडवून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील MH 19 ET 8367 क्रमांकाची मोटारसायकल तसेच हिसकावलेला मोबाईल ताब्यात घेण्यात आला. मोबाईल पीडित व्यक्तीकडे परत करण्यात आला.
या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे अमोल एकनाथ बोदडे (वय ३०, रा. रामनगर, महाबळ, जळगाव) आणि तौसिफ बेग खलील बेग (वय ३२, रा. समतानगर, जळगाव) अशी आहेत.
घटनेची माहिती तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला वायरलेसद्वारे देण्यात आली. त्यानंतर दोन्ही संशयित आरोपी आणि मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



