जळगाव प्रतिनिधी | पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरचा ताबा सुटला आणि क्षणात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. कंटेनर पलटी होऊन दुचाकीस्वाराच्या अंगावर आदळल्याने दोनगाव बुद्रुक येथील करण जनार्दन सोनवणे (वय-२६) यांचा दबून दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, तर कंटेनर रस्त्यावर पलटी झालेला पाहायला मिळाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
दरम्यान, बायपासचे काम सुरू असल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा वाढलेला ताण आणि वाहनांचा वेग अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पुढील प्रक्रियेसाठी मदत केली. दरम्यान, या अपघातामुळे रस्ते व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.



