जळगाव प्रतिनिधी | गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मेहरूण तलावातील गणेश घाटाची प्रत्यक्ष पाहणी करत तयारीचा आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
गणेश विसर्जन सोहळा स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आरोग्य विभागाने सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. भाविकांच्या सोयीसाठी गणेश घाटावरील निर्माल्य कलशांची संख्या वाढवण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
विशेष म्हणजे विसर्जनासाठी येताना नागरिक आणि गणेश मंडळांनी निर्माल्य प्लास्टिक पिशवीत आणू नये. निर्माल्य कागदात गुंडाळून किंवा कागदी पिशवीत आणून थेट निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, विसर्जनासाठी उपलब्ध तराफे, तैनात कर्मचारी, सुरक्षेच्या उपाययोजना तसेच कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भोजन व्यवस्थेचाही महापौरांनी आढावा घेतला. विसर्जनस्थळी अनावश्यक गर्दी टाळून परिसर स्वच्छ ठेवत शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्याचे आवाहन जळगावकरांना करण्यात आले आहे.



