जामनेर प्रतिनिधी | शहरातील इंदिरा आवास परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बबलू देविदास वाणी असे मयत तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बबलू यांना जखमी अवस्थेत ऑटो रिक्षातून जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. त्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याची माहिती आहे.
बबलू यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, बबलू यांच्या पायावर तसेच शरीराच्या उजव्या बाजूच्या पृष्ठभागावर गंभीर जखमा आढळून आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या जखमा फरफटत नेल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, बबलू यांच्यावर मारहाण झाली असावी, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बबलू यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात आणणारे व्यक्ती कोण होते, ऑटो रिक्षा कुणाची होती आणि बबलू यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीत जखमा झाल्या, याचा सखोल तपास करण्याची मागणी नातेवाईकांनी जामनेर पोलिसांकडे केली आहे. बबलू यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.



