रावेर (प्रतिनिधी) : रावेर शहरात घरगुती गणपती विसर्जनासाठी जात असताना रस्ता अडवून झालेल्या वादानंतर दगडफेक झाल्याच्या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक पातळीवरही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नंदकिशोर महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात भेट देत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आमदार महाजन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन गणपती विसर्जनासाठी जात असलेल्या नागरिकांना अडविणे तसेच दगडफेक करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी या घटनेप्रकरणी १४ जणांसह काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत काही नागरिक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या वेळी बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, नगरसेवक पद्माकर महाजन, भाजपा गटनेते अमोल पाटील, भास्कर महाजन, भैय्या चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, रावेरमध्ये सध्या पोलिसांचा बंदोबस्त असून नागरिकांनी अफवा न पसरवता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



