जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात राहणाऱ्या एका परप्रांतीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत विवाहितेचे नाव झीलीक तपन मंडल, रा. पश्चिम बंगाल, असे आहे. झीलीक हिचा विवाह सनाजीत नारायणचंद्र संत्रा यांच्यासोबत अवघ्या पाच महिन्यांपूर्वी झाला होता.
लग्नानंतर महिनाभरापूर्वीच हे नवदांपत्य रोजगाराच्या निमित्ताने जळगाव शहरात राहण्यासाठी आले होते. पती सनाजीत संत्रा हे शहरातील एका ठिकाणी सोने कारागीर म्हणून काम करत होते.
सनाजीत हे सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करीत असून, त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. नव्या संसाराला सुरुवात होऊन अवघा काही काळ लोटला असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी पती-पत्नीमध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सनाजीत हे त्यांच्या मालकाकडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते.
पती घराबाहेर गेल्यानंतर झीलीक मंडल हिने राहत्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले. काही वेळाने ही घटना लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.
या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विवाहितेने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



