यावल प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव आणि मालोद परिसरातील शेतशिवारातून महावितरणच्या विद्युत तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यावल पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी रात्री चोरी केलेल्या विद्युत तारांची विल्हेवाट लावण्यासाठी त्या तारांचा भंगार व्यावसायिकाला व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू असताना शेतकरी आणि नागरिकांनी चार जणांना रंगेहात पकडले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुपडू हमजान तडवी, करीम नशीर तडवी, अलाउद्दीन मजीद तडवी आणि किनगाव येथील भंगार व्यावसायिक आरिफ युसुफ मन्यार या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विद्युत तारांचे मोठ्या प्रमाणावर तुकडे, गठ्ठे तसेच चोरीसाठी वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले.
चौकशीदरम्यान विद्युत वितरण कंपनीच्या लघुदाब, ११ केव्ही आणि ३३ केव्ही क्षमतेच्या तारांची कटिंग करून चोरी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच परिसरात शोधमोहीम राबवून आणखी सात संशयितांना ताब्यात घेतले. त्यामुळे या कारवाईत एकूण ११ संशयित पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
या प्रकरणी साकळी येथील अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत तार चोरीमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पुढील तपास सहायक फौजदार वसंतराव बेलदार करीत आहेत.



