रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला असून, विवरे खुर्द येथील महिला ग्राम महसूल अधिकारी कु. दिपाली मुकुंदा बुंदेले यांनी कोतवाल ध्रुवकुमार जिरीमाळी यांच्या सहकार्याने अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याच्या तक्रारी तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार विवरे खुर्द येथील ग्राम महसूल अधिकारी कु. दिपाली मुकुंदा बुंदेले व कोतवाल ध्रुवकुमार जिरीमाळी यांनी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांनीही अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात प्रभावीपणे कारवाई करून शासनाचा महसूल वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विवरे खुर्द येथील कारवाईचा आदर्श इतर महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही नागरिकांनी केले आहे.



