जळगाव प्रतिनिधी | पुण्यात एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील विद्यार्थी प्रतिनिधींनीही आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलन सुरू केले आहे.
एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास कायम राहण्यासाठी शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जळगावातील विद्यार्थी प्रतिनिधींनी रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, जोपर्यंत पुण्यातील आंदोलन सुरू राहील, तोपर्यंत जळगावातील आमचेही आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दर्शविला. कल्पिता पाटील, एजाज मलिक, संग्रामसिंग पाटील यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी गिरीश लाडवांजरी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले.
शासनाने तातडीने आंदोलनाची दखल घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.



