रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील रमजीपूर येथील शेतातून चोरीला गेलेल्या मोटार पंपाचा रावेर पोलिसांनी छडा लावला आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी या प्रकरणात चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंप आणि कॉपर वायर चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.
रमजीपूर येथील शेतगट क्रमांक १६२२/२ मधून ३ ऑक्टोबरच्या रात्री समराई कंपनीचा पाण्याचा मोटार पंप चोरीला गेला होता. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिसांनी शेतातील मोटार आणि कॉपर वायर चोरीच्या घटनांबाबत विशेष मोहीम सुरू केली.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राजेंद्र सुधाकर महाजन, उमेश प्रकाश धनगर, रितेश जगन्नाथ कावडकर आणि आनंद गोपाल धनगर या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान चोरीचा मोटार पंप काढून दिल्याची कबुली मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अटकेतील संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. चोरीच्या या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



