जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील उमाळा-कंडारी रस्त्यावर मालवाहू रिक्षाचा भीषण अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय अर्जुन कोळी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे कंडारी गावावर शोककळा पसरली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अर्जुन हा उमाळा येथील माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी (१२ ऑक्टोबर) शाळा सुटल्यानंतर तो इतर विद्यार्थ्यांसह घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होता. मात्र, बस वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांनी खासगी मालवाहू रिक्षातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान उमाळा-कंडारी रस्त्यावर रिक्षाचा अपघात झाला. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह दहा विद्यार्थी जखमी झाले होते. गंभीर जखमी अर्जुनवर उपचार सुरू होते; मात्र मंगळवारी त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. त्याचा चुलत भाऊ कल्पेश कोळी हादेखील या अपघातात जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
### बससेवेच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?
या घटनेनंतर विद्यार्थ्यांसाठी पुरेशा आणि वेळेवर बसेस उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. गेल्या महिन्यात पारधी येथे बसमध्ये चढताना चाकाखाली आल्याने दहावीतील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी एका बसमध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थी प्रवास करत असल्याचे समोर आले होते. विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त बसेस सुरू करण्याची मागणीही करण्यात आली होती.
मात्र, बससेवेतील अडचणींचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे उमाळा-कंडारी येथील दुर्घटनेवरून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दरम्यान, संबंधित रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमित आणि अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.



