जळगाव प्रतिनिधी | पाचोरा-मोंढाळा रस्त्यावर ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शिंदाड येथील तरुणाचा मृत्यू झाला. समाधान पाटील असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे शिंदाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा-मोंढाळा रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात दुचाकीस्वार समाधान पाटील गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमी समाधान पाटील यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. पाचोरा-मोंढाळा रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ झालेल्या या दुर्घटनेमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या अपघातप्रकरणी पाचोरा पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबतची अधिक माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.



