जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळण्याच्या प्रकाराची महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी संबंधित ठेकेदाराला कडक तंबी देत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर महापौरांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. यापुढे कचरा जाळल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना दिला.
दरम्यान, डम्पिंग ग्राउंडवरील प्लॅटफॉर्मचे काम अपूर्ण असून, पुण्यातील कंपनीकडून शेडचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामांतील दिरंगाईबद्दल महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच कंपाऊंड वॉलसह इतर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले.
या पाहणीवेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, स्थानिक नगरसेविका जयश्री पाटील, उपायुक्त निर्मला गायकवाड, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले आणि प्रकल्प अभियंता योगेश वाणी उपस्थित होते.



