जळगाव प्रतिनिधी : शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात जळगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत ८५ हजार रुपये आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास बिस्मिल्ला चौक, अमजनेरी गल्ली परिसरातून मोटारसायकली चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपीचा शोध घेतला.
या प्रकरणात सोनू उर्फ साहिल मोहम्मद तडवी (वय २३, रा. मच्छी बाजार, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची हिरोहोंडा एसडी डॉन कंपनीची मोटारसायकल आणि ५० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



