अमळनेर प्रतिनिधी| तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचा हात पकडत लग्नासाठी दबाव टाकल्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना अमळनेर शहरात घडली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सूरज नंदलाल पाटील याच्याविरुद्ध विनयभंग व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शिक्षण घेत असून, ती नेहमीप्रमाणे १३ ऑक्टोबर रोजी अमळनेर शहरात आली होती. टायपिंग क्लास संपल्यानंतर ती एका मंदिराजवळ उभी होती. यावेळी संशयित आरोपी सूरज नंदलाल पाटील (रा. अमळनेर) हा दुचाकीवरून तिच्याजवळ आला. त्याने तरुणीला ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत तिचा उजवा हात पकडला. तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आरोपीला हात सोडण्यास सांगितले. हात सोडला नाही तर आरडाओरड करेन, असा इशाराही तिने दिला. त्यानंतर संशयित आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला.
घरी गेल्यानंतर पीडित तरुणीने घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी सूरज नंदलाल पाटील याच्याविरुद्ध विनयभंग आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून, पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.



