जळगाव प्रतिनिधी | शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत ३५ वर्षीय महिला जखमी झाली असून, तिच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या या महिलेचे रोहन मधुकर सपकाळे या ३० वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधाला रोहनचा भाऊ अनिकेत याचा विरोध असल्याची माहिती समोर आली आहे.
रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संबंधित महिला आणि रोहन हे दुचाकीवरून जुन्या बसस्थानक परिसरातून जात होते. त्यावेळी अनिकेतने त्यांचा पाठलाग केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर जुन्या बसस्थानकाजवळ दोघांवर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. या गोळीबारात महिलेच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने ती जखमी झाली.
घटनेनंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या गोळीबारामागील नेमके कारण काय, घटनेत वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत काय माहिती समोर येते आणि आरोपीविरोधात पुढे कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



