जामनेर प्रतिनिधी|जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शेतीकाम करताना घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत ३७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. भागदरा शिवारात मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून योगेश भावालाल पाटील यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे तीन मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेतकरी दिनेश महाजन यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते. यावेळी योगेश पाटील हे मका काढण्याचे मशीन चालवून शेतीकाम करत होते. मात्र, काम सुरू असतानाच ते मशीनमध्ये अडकले आणि या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
योगेश पाटील हे शेतीकामासोबतच मका काढण्याचे मशीन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन मुलांनी वडिलांचे छत्र गमावल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. शेतीकामादरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, एका कुटुंबाचा आधार हरपल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.



