जळगाव प्रतिनिधी | अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचार आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी जळगाव न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी पवन कैलास सोनवणे (वय १९, रा. नांद्रा बुद्रुक, ता. जि. जळगाव) याला सात वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या निर्णयामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत कायद्याचा कठोर बडगा पुन्हा अधोरेखित झाला आहे.
न्यायालयीन कागदपत्रांनुसार, १८ जुलै २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नांद्रा बुद्रुक गावाबाहेरील गिरणा नदीपात्राजवळ ही घटना घडली. आरोपीने पीडितेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडिया तसेच व्हॉट्सॲपवर व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. या धमकीचा वापर करून पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास अधिकारी गणेश चव्हाण यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तसेच विशेष सरकारी वकील सी. चारुलता राजेंद्र बोरसे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी सहकार्य केले.
सरकार पक्षाचा पुरावा आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम ३ व ४ नुसार सात वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ नुसार दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि धमक्यांच्या घटनांमध्ये दोषींना कायदेशीर शिक्षेला सामोरे जावे लागते, हा स्पष्ट संदेश गेला आहे.



