यावल प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी विवाह केल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर यावल पोलीस ठाण्यात बलात्कार, पॉक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिच्याशी जवळीक साधली. अल्पवयीन असताना तिच्याशी लग्न केले.
विवाहानंतर आरोपीने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, या प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा पीडित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. तिला प्रसूतीसाठी उपचार घ्यावे लागल्याची माहितीही तक्रारीत देण्यात आली आहे. अखेर पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रवींद्र धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक मेहबूब सय्यद तपास करीत आहेत.



