
एक हादरवून टाकणारी २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरणाची थरारक घटना
जळगावात एक हादरवून टाकणारी २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरणाची थरारक घटना अवघ्या काही तासांत उघडकीस आली आहे. शनिपेठ पोलिसांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने विजेच्या वेगाने कारवाई करत दोन प्रौढ आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत पीडितांची सुखरूप सुटका केली. ही माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल साहित्य विक्रेते कृष्णकुमार डुंगराराम चौधरी (वय ३२) यांना आरोपी यश जितेंद्र माकोडे (वय २२, रा. जळगाव) याने १५ फेब्रुवारी रोजी चलाखीने जाळ्यात ओढले. त्याने प्रथम फिर्यादींचा भाचा गणपतलाल माली (वय १९) याला ममुराबाद रोडवरील एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर कृष्णकुमार यांना त्यांच्या स्वतःच्या मोटारसायकलवर बसवून अकोल्यात नेण्यात आले.
अकोल्यात आरोपी युवराज गणेश पवार (वय २४) याच्या मदतीने कृष्णकुमार यांना बंदिस्त करून जिवे मारण्याची धमकी देत तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. सुरुवातीला आरोपींनी १५ हजार रुपये ‘गुगल पे’द्वारे स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले. पुढे, भाच्याला अकोल्यात ओलीस ठेवत कृष्णकुमार यांना २० लाख रुपये घेऊन जळगावला जाण्यास भाग पाडण्यात आले.
मात्र, जळगावात पोहोचताच कृष्णकुमार यांनी धाडस दाखवत थेट शनिपेठ पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. अकोला एलसीबीचे प्रभारी पो.नि. शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचे लोकेशन शोधण्यात आले.
जळगाव व अकोला पोलिसांच्या संयुक्त पथकाने तात्काळ कारवाई करत ताथोड नगर (अकोला) येथील घरातून गणपतलाल याची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईत यश माकोडे, युवराज पवार आणि एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. जलद आणि अचूक मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


