पाचोरा प्रतिनिधी | सारोळा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या विविध कामकाजात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी सखोल व निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपोषणाची अखेर आमदार किशोर पाटील यांच्या आश्वासनानंतर सांगता झाली.
ग्रामपंचायतीच्या मागील काही वर्षांतील विकासकामे, निधीचा वापर, प्रशासकीय निर्णय आणि इतर कामकाजाची चौकशी करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. यापूर्वी प्रशासनाकडे निवेदने आणि तक्रारी देऊनही अपेक्षित स्वरूपात चौकशी झाली नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, आमदार किशोर पाटील आणि गटविकास अधिकारी के. बी. अंजने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
यानंतर ग्रामपंचायतीच्या कामकाजाची अतिरिक्त गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून १८ सप्टेंबरपासून सखोल चौकशी करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. त्यांनी अतिरिक्त गटविकास अधिकारी पाटणकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून चौकशीबाबत निर्देश दिले.
ग्रामपंचायतीला मिळालेला निधी, झालेला खर्च, विकासकामांच्या मंजुरी, अंदाजपत्रके, मोजमाप पुस्तिका, बिले आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून चौकशी अहवाल ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी आहे.
उपोषणावेळी हेमराज पाटील, जगदीश पाटील, रविंद्र अहिरे, समाधान भोई, विशाल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



