
करगाव शिवारात विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी : करगाव शिवारात विना परवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून पोलिसांनी कारवाई केली असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ५ हजार रुपये किमतीची सव्वा ब्रास वाळू तसेच अंदाजे ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली असा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय शिंदे, तुकाराम चव्हाण, ओंकार सुतार, प्रविण सपकाळे, पो.कॉ. श्रीराम कांगणे आदीं नी केली आहे . शुक्रवारी (दि. २०) रात्री १० वाजेच्या सुमारास करगाव येथील लांबे–वडगाव रस्त्यावर गस्त घालत असताना विना क्रमांकाचे ट्रॅक्टर संशयित अवस्थेत येताना आढळले.
ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता ट्रॉलीमध्ये वाळू आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीसंदर्भात कोणताही शासकीय परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बेकायदेशीररीत्या शासनाच्या मालकीच्या गौण खनिज वाळूची वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर व ट्रॉलीसह सव्वा ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पो.कॉ. श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक महेश पाटील (रा. वडगाव लांब) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) सह खाण व खनिज अधिनियम १९५७ चे कलम २१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७), ४८ (८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार विजय शिंदे करीत आहेत. या कारवाई मुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


