
केवळ १४ जणांची नसबंदी; वर्षभरात पाच हजारांवर महिलांनी घेतला पुढाकार
जळगाव : एक किंवा दोन अपत्य झाल्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जात असते. यात कुटुंब नियोजनासाठी महिला किंवा पुरुष यापैकी कोणीही शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. मात्र, असे असले तरी कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्यांमध्ये महिलाच पुढे असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात या वर्षभरात पाच हजार १९८ महिलांनी व केवळ १४ पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली आहे.
कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत लहान कुटूंब अर्थात एक किंवा दोन अपत्य झाल्यानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केली जात असते. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी महिला व पुरुष या दोघांची सारखीच जबाबदारी असते. मात्र, काही गैरसजामुळे पुरुष या शस्त्रक्रियेसाठी पुढे येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून पुरुषांनी या शस्त्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवाड्यात जिल्ह्यातील आरोग्य
संस्थांमध्ये पुरुष नसबंदीविषयक जनजागरण करण्यात आले. या पंधरवड्यामध्ये तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
पुरुष नसबंदी सोपी
पुरुष नसबंदी ही शस्त्रक्रिया स्त्रीनसबंदी शस्त्रक्रियेच्या तुलनेत फारच सोपी व सुरक्षित आहे. ही शस्त्रक्रिया भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातसुद्धा करता येते. या शस्त्रक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते. सोपी, जलद व कमी गुंतागुंत असलेली प्रक्रिया असून, ज्यात टाके टाळल्याने रुग्णाला आराम मिळतो व तो लगेच कामावर परत जाऊ शकतो, असे असतानादेखील पुरूष ही शस्त्रक्रीया करण्यास पुढे येत नाहीत.


