जळगाव प्रतिनिधी | ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम संचालित ‘न्याय विश्वास फाउंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात जिल्हाभरातील असंख्य नागरिकांनी सहभाग घेत विविध कायदेशीर प्रश्नांवर तज्ज्ञ वकिलांकडून मोफत मार्गदर्शन मिळवले.
निकम कुटुंबाला लाभलेल्या वकिली क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा वारसा पुढे नेत अॅडव्होकेट अनिकेत निकम सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कायदेशीर मदत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत. बॅरिस्टर निकम आणि पद्मश्री अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी उभारलेल्या न्यायसेवेच्या परंपरेला पुढे नेत न्यायव्यवस्थेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरात जमिनीचे वाद, ७/१२ उतारे, मालमत्तेचे हक्क, कौटुंबिक वाद, पती-पत्नीमधील प्रकरणे, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रक्रिया, सायबर गुन्हे, ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय गरजू नागरिकांना मोफत सरकारी कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याबाबतही माहिती देण्यात आली.
प्रास्ताविकात ॲड. अनिकेत निकम यांनी न्याय विश्वास फाउंडेशन स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना, समाजात न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करणे आणि कायद्याविषयी जनजागृती करणे हेच संस्थेचे ध्येय असल्याचे सांगितले.
भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे नागरिकांना न्यायव्यवस्थेशी जोडण्याचे कार्य सातत्याने सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत न्याय विश्वास फाउंडेशनच्या वतीने भविष्यातही अशा जनहिताच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ॲड. अनिकेत निकम यांनी सांगितले.



