
उत्तर प्रदेशातील ऐन परीक्षा काळात वर्गाबाहेर रक्ताचा सडा
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील नामांकित उदय प्रताप कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शुक्रवारी भरदिवसा सदर घटना घडली.
नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये आले होते. त्यानंतर, एका वर्गाबाहेर एका विद्यार्थ्यावर गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला. यामुळे कॅम्पसमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. कॉलेजमधील पदव्युत्तर विद्यार्थी सूर्य प्रताप सिंग याचा मनजीत कुमार नावाच्या दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत एका क्षुल्लक मुद्द्यावरून वाद झाला होता. या वादातून ही हत्या करण्यात आली. या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वाराणसी पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी प्रमोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कारवाई करताना आरोपी मनजीत कुमार याला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेनंतर विद्यार्थीही प्रचंड संतप्त झाले होते.
विद्यार्थ्यांनी या प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले. परीक्षेच्या काळात एक विद्यार्थी शस्त्र घेऊन कॅम्पसमध्ये कसा काय प्रवेश करू शकतो, असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनावरही संताप व्यक्त केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


