
प्राथमिक शाळा आणि हायस्कूल आता सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
जळगाव । वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळा आणि हायस्कूल आता सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी जारी केले आहेत.
नवीन वेळापत्रकानुसार शाळा सकाळी ७:०० ते ११:४५ या वेळेत चालणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी आज शुक्रवारपासून करण्यात येणार असून सर्व शाळांनी तत्काळ नवीन वेळापत्रक लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्यात कोणतीही दिरंगाई अथवा दुर्लक्ष झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


