
प्रभाग क्रमांक 1 मधील पिंपळा रेल्वे उड्डाण पुल परिसरात वाढत्या वाहतूक कोंडी,
जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मधील पिंपळा रेल्वे उड्डाण पुल परिसरात वाढत्या वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या गंभीर परिस्थितीमुळे अपघातांचा धोका देखील वाढला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे,
तर अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते अरुंद झाल्याने रहदारी अधिकच विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेविका सौ. भारती सागर सोनवणे यांनी महापौरांकडे निवेदन सादर करून D.P. प्लॅननुसार सर्कल विकसित करणे, अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करणे तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. “विकासाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे,
अन्यथा भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता प्रशासन या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहणार आणि अनधिकृत बांधकामांवर प्रत्यक्षात कारवाई होणार का, की नागरिकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


