
पोलीस अधीक्षकांनी केलेल्या विनंतीचा विचार करून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जळगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलरोजी जळगाव जिल्ह्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निर्गमित केले आहेत. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या विनंतीचा विचार करून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारची देशी व विदेशी मद्यविक्री दुकाने, परमिट रूम, बिअर शॉपी आणि ताडी दुकाने व किरकोळ मद्यविक्री केंद्र १४ एप्रिलरोजी बंद राहतील. १४ एप्रिल रोजी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अनुज्ञप्तीधारकावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक शांतता आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी संबंधितांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.


