जळगाव प्रतिनिधी । जळगाव पोलीस मुख्यालय परिसरात सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मशिदीजवळ असलेल्या पोलीस मालकीच्या पत्र्याच्या शेडला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत पोलीस विभागाचे महत्त्वाचे दस्तऐवज, जुने रेकॉर्ड आणि अनेक मौल्यवान साहित्य जळून खाक झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजताच्या सुमारास या शेडमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. सदर शेडमध्ये पोलीस विभागाचे जुने रेकॉर्ड, पंचनामा बुक्स, झेरॉक्स मशीन, संगणक, तसेच दंगल नियंत्रणासाठी लागणारे बॅरिकेट्स, हेल्मेट्स, लाठ्या आणि अन्य फर्निचर साठवून ठेवण्यात आले होते. हे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि महापौर दिपमाला काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. एकूण ४ बंबांच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे आग परिसरातील इतर वास्तूंना विळखा घालण्यापासून वाचली. सध्या आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस नोंद झालेली नाही.
अग्निशमन दलाचे धाडस
ही आग आटोक्यात आणण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, केंद्र अधिकारी भारत बारी यांच्यासह वाहनचालक आणि फायरमनच्या संपूर्ण टीमने अत्यंत धाडसाने काम केले. यात देविदास सुरवाडे, संतोष तायडे, दीपक चौधरी, शोएब तडवी, अक्षय नाईक, किरण महाजन, तेजस जोशी, वृषभ सुरवाडे, यश मनोरे, नवल शंकरपाळ, सुमित साबळे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, विकी सोनवणे, सरदार पाटील, संजय तायडे, अनिकेत पाटील आणि भूषण पाटील या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



