जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या स्थानिक महिलांनी सोमवारी महानगरपालिकेत धडक देत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. ‘पाणी द्या, पाणी द्या, महापौर ताई पाणी द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागत असून महिलांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर महिलांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासनाने आंदोलक महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाकडून सांगण्यात आले की, कांचन नगर भागात सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे काही महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
महिलांच्या संतापाची दखल घेत प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात जुन्या पाइपलाइनवरून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच लवकरच समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचेही सांगण्यात आले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामुळे शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून नागरिकांनी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.



