जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये महावितरणच्या अत्यंत अनियमित आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी वीज गुल राहत असल्यामुळे स्थानिक रहिवासी प्रचंड त्रस्त असून, प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरोधात आता संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
या गंभीर समस्येबाबत ‘प्रभाग क्रमांक ९ समस्या ग्रुप’च्या नेतृत्वाखाली सुमारे ४० नागरिकांनी निमखेडी सबस्टेशनमध्ये लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने या तक्रारींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः २२ एप्रिल रोजी रात्री २ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. धक्कादायक बाब म्हणजे, या काळात सबस्टेशनवर अधिकारी उपस्थित नव्हते आणि नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनीही उचलले गेले नाहीत. हा प्रकार ग्राहक सेवेच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारा असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
आता या प्रकरणात संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांचा आधार घेतला आहे. नियमानुसार वीज खंडित कालावधीसाठी ग्राहकांना भरपाई मिळणे बंधनकारक आहे, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. नागरिकांनी आपल्या निवेदनात वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि नियमानुसार प्रभावित ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. जर प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर उच्च अधिकारी आणि थेट ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.



