जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाढत्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या दुचाकीस्वारांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महत्त्वाची मागणी पुढे केली आहे. शहरातील वाहतूक सिग्नल सकाळपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवून त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेला दिले.
सध्या तापमानाचा पारा चढत असल्याने सिग्नलवर उन्हात थांबणे दुचाकी चालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. दीर्घकाळ उन्हात उभे राहिल्यामुळे चक्कर येणे, डिहायड्रेशन आणि अशक्तपणाच्या तक्रारी वाढत असल्याचा मुद्दा मनसेने उपस्थित केला. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
मनसेने प्रमुख चौकांमधील सिग्नल दिवसभर बंद ठेवून वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची नियुक्ती करण्याचा पर्याय सुचवला आहे. या मागणीची वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दखल घेत सकारात्मक भूमिका दर्शवली असून लवकरच याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास उन्हाच्या तडाख्यातून दुचाकीस्वारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या निवेदनावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



