अमळनेर प्रतिनिधी | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मध्यस्थालाच बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना अमळनेर तालुक्यातील बोहरा गावात घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय भीमराव भिल (वय ४५, रा. बोहरा) हे ३० एप्रिल रोजी सायंकाळी गावातील एका किराणा दुकानासमोर उभे होते. त्यावेळी तिथे संशयित आरोपी शेखर संतोष मेहेरे आणि राजेंद्र वर्णेवर कोळी यांच्यात वाद सुरू होता. संजय भिल यांनी सामाजिक बांधिलकीतून मध्यस्थी करत “भांडण करू नका” असे सांगून दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग धरून आरोपी शेखर याने शिवीगाळ केली.
वादाचे पर्यवसान रात्री हिंसक वळणात झाले. रात्री ८ वाजेच्या सुमारास संजय भिल हे आपल्या मित्राच्या घरासमोर बसलेले असताना आरोपी शेखर संतोष मेहेरे आणि त्याचा मोठा भाऊ सागर संतोष मेहेरे तिथे आले. “तू आमच्या भांडणात का पडला?” असा जाब विचारत दोघांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी शेखरने जमिनीवर पडलेली वीट उचलून संजय यांच्या डाव्या डोळ्यावर आणि नाकावर जोरात प्रहार केला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
इतक्यावरच न थांबता, “तू गावात कसा राहतो, तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकीही आरोपींनी दिली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.



