जळगाव प्रतिनिधी । कानळदा रोडवरील नवीन हायवे पुलाखालील पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. एका तरुणाने दुचाकी अपघाताबाबत विचारपूस केल्याचा राग मनात धरून तिघा संशयितांनी त्याच्यावर आणि त्याच्या मित्रांवर लोखंडी रॉड व स्टील पट्टीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रतिलाल संतोष सोनवणे (वय ३२, रा. हरिओम नगर) हे त्यांचे मित्र मयुर लहासे यांच्यासोबत झालेल्या दुचाकी अपघाताची माहिती घेण्यासाठी संबंधितांकडे गेले होते. यावेळी आरोपी फैजल शेख सलीम, अफान शेख अफसर आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने वाद घालण्यास सुरुवात केली. साध्या विचारपुसीतून सुरू झालेला हा वाद काही वेळातच तीव्र हाणामारीत बदलला.
या दरम्यान, आरोपी फैजल शेख याने हातातील लोखंडी रॉडने रतिलाल यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात रतिलाल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतक्यावरच न थांबता, आरोपी अफान शेख याने स्टीलच्या पट्टीने फिर्यादीचे मित्र हर्षल कोळी व आनंद विसपुते यांच्या हातापायावर मारहाण करून त्यांनाही जखमी केले. तिन्ही आरोपींनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना अर्वाच्य शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी जलद कारवाई करत फैजल शेख सलीम आणि अफान शेख अफसर या दोघांना अटक केली असून, तिसऱ्या अनोळखी आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब नामदेव माळी करत आहेत.



